कोल्हापूर :- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. गर्दीचे दिवस वगळता गाभाऱ्यातून दर्शनाची सुविधा पूर्ववत करत असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले.
अंबाबाई मंदिर परिसरातील विविध विकास कामाचा शुभारंभ मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना अंबाबाई मंदिर परिसराचा कायापालट केला जाणार असून, या परिसराला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल असे त्यांनी सांगितले. कोरोना कालावधीत अंबाबाई मंदिराचे गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्यात आले होते. आता ते पूर्ववत सुरू करत असल्याचे केसरकर यांनी सांगितले. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि शाहू मिल आंतरराष्ट्रीय स्मारक आराखड्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर लवकरच सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.