जनशक्तीचा दबाव न्यूज | नवी दिल्ली | फेब्रुवारी १, २०२३.
भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये गेल्या सहा वर्षांत सरासरी वार्षिक ४.६ टक्के वाढीसह दमदार वाढ होत आहे. यामुळे कृषी आणि संलग्न क्षेत्रे, देशाच्या सर्वांगीण विकास, वृद्धी आणि अन्न सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम झाली आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्यांनी आज संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३’ मांडले. देश, गेल्या काही वर्षात, कृषी उत्पादनांचा निव्वळ निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. २०२१-२२ मध्ये निर्यात विक्रमी ५०.२ अब्ज अमेरीकी डॉलर्सवर पोहोचली आहे.
पीक आणि पशुधन उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना, हमीभावाच्या (किमान आधारभूत किंमत) माध्यमातून शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची सुनिश्चितता, पीक विविधीकरणास प्रोत्साहन आणि पत उपलब्धता वाढवणे, यांत्रिकीकरण सुलभ करणे तसेच फलोत्पादन आणि सेंद्रिय शेतीला चालना देणे यासाठी केलेले केंद्रीत कार्य याला कृषी क्षेत्राच्या वाढीचे श्रेय जाते असे सर्वेक्षणात म्हटले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने या उपाययोजना असल्याचे सर्वेक्षणाचे निरीक्षण आहे.