उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका…
जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | जानेवारी ३१, २०२३.
पूर्वाश्रमीचे भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं शिवबंधन हातावर बांधलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही असंख्य लोकांना भाजपात चांगल्या पदावर बसवलं. पण ५० लोक भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे पक्षाला काय झालंय, हेच कळत नाही. पक्षाला आमची गरज राहिली नाही, अशी खंत अद्वय हिरे यांनी व्यक्त केली.
अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. “आम्ही काही जणांना हिरे म्हणून नाचवत राहिलो. दगडांनाच हिरे समजत होतो, मात्र दगड गेले, बुडाले आणि बुडणार आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
पुढे ते म्हणाले, “गद्दार लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी जगत आहेत. त्यांना माणुसकी राहिलेली. वापरा आणि फेका अशी वृत्ती आहे. काही जणांनी अन्नाची शपथ घेतली आणि गद्दारी केली. आता अन्नाची शपथही खरी घेतली नसेल तर काय बोलणार?”
दरम्यान, “अद्वय हिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना आणखी दोन पावलं पुढे चालेल. हिरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला फायदा होईल. शिवसेना संकटात असताना आपण पक्षात प्रवेश केलात, याला जास्त महत्त्व आहे”, असं संजय राऊत म्हणाले. आजच्या संकटात शिवसेनेचा तुम्ही हात पकडलाय, तो तुम्ही पकडा आणि आम्ही सोडणार नाहीत, असं करत वक्तव्य संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांचं स्वागत केलं.