मला डावललं गेलं, बाजूला ठेवण्यात आलं, मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा अपमान सहन करणं माझ्या रक्तात नाही, शिवसेनेतून बाहेर पडल्यावर भरत भगत यांची ज्वलंत प्रतिक्रिया

Spread the love

कर्जत (नेरळ) : सुमित क्षीरसागर

कर्जत तालुक्यातील शिवसेनेचा बुलंद आवाज अशी ओळख असलेल्या भरत भगत हे गेले काही दिवस शिवसेना ठाकरे गटात नाराज होते. शिवसेना ठाकरे गटात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना देखील ते दिसत नव्हते. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार अशा चर्चा असतानाच यंदाच्या २६ जुलै रोजी कर्जत तालुक्यातील राजकारणात पुलाखालून बरेच पाणी गेले म्हणत स्वातंत्र्य सैनिकाचे सुपुत्र असलेल्या भरत भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. आणि त्यावरून अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र इतके दिवस शांत असलेल्या भरत भगत यांनी त्यावर आता आपल्या शैलीत ज्वलंत अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत मला डावललं गेलं, मला बाजूला ठेवण्यात आलं मात्र मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे आणि अपमान सहन करणं माझ्या रक्तात नाही अशी तोफ भगत यांनी डागली आहे.

कर्जत तालुक्यातील कळंब येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात भरत भगत यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेनेतून बाहेर का पडलो ? का आपल्यावर अशी वेळ आली यावर त्यांनी मौन सोडले आहे. यावेळी बोलताना भाई भरत भगत म्हणाले कि ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर कर्जत येथे झालेल्या सभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे कर्जतमध्ये आले असताना मी शब्द दिला होता कि मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहील. त्यानंतर काही दिवसांनी माथेरानचे शिवसेनेचे पदाधिकारी प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला झाला होता. तेव्हा एका बैठकीत मी आमच्या शिवसेनेच्या नेत्यांना म्हणालो होतो कि आपण पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली पाहिजे, या घटनेबाबत आवाज उठवला पाहिजे. मात्र बैठक संपल्यावर शिवसेनेचे बबन पाटील, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर हे पळून गेले. त्यामुळे त्यांचा माझा वाद झाला. त्यावेळी तालुक्याचा मेळावा घ्या असे मी सुचवले होते तोही त्यांनी नाकारला. त्यानंतर मी कळंब येथील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मेळावा घेतला तो यशस्वी देखील झाला. त्यानंतर तालुक्यात मेळाव्याची सुरवात झाली. याचदरम्यान कर्जत तालुक्यातील शिवसेना नेतृत्व यांनी मला बाजूला ठेवलं. मला बैठकीला बोलावलं जात नव्हतं, आमंत्रण केलं जात नव्हतं. यामागे वाद फक्त इतकाच होता कि नेमणूक करताना सर्वाना विश्वासात घेऊन कराव्यात मात्र माझी हि मागणी धुडकावण्यात आली. याचमुळे आमच्यात दरी निर्माण झाली. तेव्हा मी विचार केला कि हे जर मला बोलवत नाहीत तर याना माझी गरजच नाही आणि हा विचार करून मी शिवसेना भवन येथे शिवसेना सचिव विनायक राऊत यांना मागील दसऱ्यापासून मी भेटत होतो. किशोरी पेडणेकर, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे या नेत्यांशी देखील मी बोललो. कर्जत तालुक्यातील परिस्थिती त्यांना समजून सांगितली. मात्र त्यातून देखील काही फलित निघालं नाही. त्यामुळे मला डावललं जात असल्याचे समजल्यावर मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची व्यस्था भरत भगत यांनी मांडली. तर मी एक स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. मी अपमान सहन करणारा माणूस नाही. हिंदुह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची देखील शिकवण आहे कि जिथे सन्मान नसेल तिथे थांबू नका. याप्रमाणे नि शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. असे म्हणत मला जनतेची काम करायची आहेत. मात्र मला खुंटवण्यात आलं होत त्यामुळे बाहेर पडणं गरजेचं असल्यानेच मी पक्ष सोडला मात्र मी कोणावर आरोप करत नाही. तर तीन जिल्ह्यासाठी समन्वयक नेमलेले विजय कदम याना मी फोन मेसेज करून सांगितलं साहेब मी आता बाहेर पडत आहे मात्र एक फोन करण्याची तसदी घेतलेली नाही त्यामुळे माझी शिवसेनेला गरज उरलेली नसल्याचे मला दिसते. तर शिवसेनेत जे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊन काम करावं अशी यानिमित्ताने विनंती करत असल्याचे भरत भगत यांनी सांगितले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भरत भगत यांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आलं आहे. तर कळंब भागात त्यांची विशिष्ट अशी ताकद देखील आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला भगत यांना गमावल्याने फटका बसणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page