अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आवाहन.
जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | जानेवारी ३१ २०२३.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला आहे. तसेच या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. आता यातच अनिल परब यांनी देखील सोमय्यांना आव्हान केले आहे. “हिंमत असेल तर तू इकडे ये, आम्ही स्वागतासाठी तयार आहोत” असे आव्हान परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा करत या संदर्भातील फोटो ट्विट केले. या तोडलेल्या ठिकाणाची पाहणी देखील करण्यासाठी सोमय्या येणार आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सोमय्या यांना बीकेसीजवळ रोखले आहे.
याप्रकरणी माजीमंत्री अनिल परब देखील आक्रमक झाले आहे. परब यांनी पत्रकार परिषद घेत थेट सोमय्या यांना आव्हानच केले आहे. परब म्हणाले, १९६० पासून या इमारतीचा रहिवासी आहे. मी या या बिल्डिंगमध्ये माझं कार्यालय सुरु केलं आहे. ही जागा मुळात एलआयसीची आहे. हायकोर्टाच्या सुचनेनुसार ही जागा नियमित करण्यासाठी रहिवाश्यांनी अर्ज केला. ही जागा नियमित करता येणार नसल्याचे कळल्याने मोकळी केली. मी म्हाडाला पत्र लिहिलं आहे.
मात्र मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली असं अनिल परब यांनी सांगितलं. किरीट सोमय्याने बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे असाही आरोप अनिल परब यांनी केला आहे.
दरम्यान परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावरून सोमय्या यांच्यावर हल्ला केला. नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. माझ्यासोबत किरीट सोमय्या ती तोडक कारवाई बघायला येणार का? असाही खोचक प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे.
आम्ही किरीट सोमय्यांना आव्हान देतो आहे हिंमत असेल तर ये इकडे तुझं स्वागत करायला आम्ही तयार आहोत. गरीब कुटुंबाचं नुकसान कुणी करणार असेल तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही. मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे असंही अनिल परब यांनी सांगितलं.