सायकलला बसवले १६ आरसे आणि ८ इंडिकेटर; बारामती तालुक्यातील उत्तमराव माळवे यांची सर्वत्र चर्चा

Spread the love

बारामती- कोणाला कशाची हौस असेल सांगता येत नाही. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव येथील उत्तमराव दादासाहेब माळवे रा. माळेगाव बुद्रुक यांचा नादच खुळा. वयाच्या ७५ व्या वर्षी ते सायकल चालवतात हे एक वैशिष्ट्य. पण त्यापेक्षा त्यांनी सगळी सायकल आरशाची बनवलेली आहे हे दुसरे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सायकलला १६ आरसे आणि ८ इंडिकेटर आहेत. सगळ्यांनी आपल्याला पाहावं हा त्यांचा या मागचा उद्देश आहे. अर्थात कोणी पहावं तर मोटर सायकलवाल्यांनी पहावं. चारचाकी वाहन वाल्यांनी पहावं, असं त्यांचं म्हणणं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील माळवे हे महावितरण कंपनीतून निवृत्त झालेले आहेत. मात्र त्यांनी व्यायाम म्हणून सायकल चालवण्याचा छंद कायम जोपासला आहे. ते बारामती तालुक्यातील माळेगाववरून बारामतीपर्यंत सायकल चालवतात आणि बारामतीवरून पुन्हा माळेगावकडे जातात हा त्यांचा दररोजचा नित्यक्रम आहे. माळवे यांना अशी सायकल करायचा नाद कसा सुचला यावर त्यांनी केवळ आपण जे सायकल चालवतो ती इतरांनी पहावी या अनुषंगाने त्यांनी सायकलमध्ये बदल केले.

बदल केले म्हणजे काय केले तर सायकलला आरसे जोडले. त्यांची अख्खी सायकल जिकडे पहावे तिकडे आरशांनी भरून गेली आहे. अनेक लोक त्यांच्याकडे पाहतात ते केवळ ती सायकल चालवतात म्हणून नाही तर एवढी विचित्र सायकल कशी बनवली आहे म्हणूनही पाहतात. या पाहण्यामुळे तरी किमान या वयात मी सायकल चालवतो हे लोकांना कळावे, हाच त्यांचा एकमेव या मागचा उद्देश आहे. सध्या मात्र या आरशाची सायकल बारामती तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page