भारताच्या दक्षिण कोरियातील राजदूतांची घेतली भेट, महाराष्ट्राच्या गुंतवणुकीत पडणार भर
रत्नागिरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत हे ३ दिवसाच्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून यावेळेस त्यांनी भारताचे दक्षिण कोरियातील राजदूत अमित कुमार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी त्यांना निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढावी आणि येथील स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी एक पाऊल पुढे येऊन परदेशातील गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या भेटीगाठी घेऊन महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये भर पाडण्यासाठी यावेळेस निमंत्रण दिले आहे.
उद्योग मंत्री ना. उदय सामंत परदेश दौऱ्यावर असताना दक्षिण कोरियातील राजदूत अमित कुमार यांच्या पुढाकाराने ना.उदय सामंत हे सॅमसंग, एल जी, ह्युंदाई, योसंग, चैन्गशीन ह्या कंपनीना भेट देऊन महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत बैठक करणार आहेत. या परदेशाच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या गुंतवणुकीमध्ये नक्कीच भर पडणार असल्याचे मत उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
यां दौऱ्यादरम्यान उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या समवेत प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, दक्षिण कोरियाचे प्रथम सचिव स्वप्नील थोरात उपस्थित होते.