बाबा रामदेव यांचे वादग्रस्त विधान नेमके काय?
🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | जळगाव | जानेवारी ३१, २०२३.
◼️ जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा-लबाना नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बाबा रामदेव उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सतत वादग्रस्त विधान करण्याची जणू मालिकाच सुरू आहे. अशातच आज कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना बाबा रामदेव म्हणाले, आम्ही जर भेदभाव केला असता, तर ख्रिश्चन धर्मीय इथे एकही पाऊल पुढे टाकू शकला नसता. जर आम्ही हत्यार उचलले असते, तर इथे एकही मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असे वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलेले आहे. तसेच, हिंदू धर्म हा एक विश्वधर्म आहे, असेदेखील ते यावेळी म्हणाले.
◼️ पुढे बोलताना बाबा रामदेव म्हणाले, हिंदू धर्म हा केवळ राष्ट्रधर्म नाही, तर हिंदू धर्म विश्वधर्म असून एक युगधर्म आहे. सनातन म्हणजे नित्य, शास्वत धर्म आहे. त्याला कुठलीही शक्ती मिटवू शकत नाही. ज्याप्रमाणे कुणी अग्नी, जल, वायू आणि पृथ्वीचा धर्म बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे कुणीही हिंदू धर्म बदलू शकत नाही हे शास्वत सत्य आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, भारतातील एकही व्यक्ती आपल्या इच्छेने मुस्लिम बनला नाही, तर जबरदस्तीने त्यांना मुस्लिम बनवले आहे. आता त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याची गरज आहे. आपापसातील सर्व भेदभाव विसरून समस्त हिंदू समाजाने एकजूट होण्याची गरज आहे. एकमेकांच्या संकटात मदतीसाठी धावून जाणे हाच आपला धर्म आहे, असेदेखील ते म्हणाले. दरम्यान, या कुंभात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आदी राज्यांमधून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत.