खेड शिवतर गावातील सैनिकांच्या सेवानिवृत्तीनंतर त्याची कामे प्राधान्याने करणे हे गौरवास्पद -हेमंत भागवत

Spread the love

खेड; प्रतिनिधी खेड तालुका सैनिकांचा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात आजी-माजी सैनिक आहेत. त्यातही शिवतर गाव सैनिकांचे म्हणून ओळखले जाते. प्रत्येक सैनिक देशासाठी प्राण देण्यासाठी तयार असतो.सेवानिवृत्तीनंतर त्याची कामे प्राधान्याने करणे हे गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल हेमंत भागवत यांनी केले.

श्री. भागवत हे महसूल सप्ताहानिमित्त खेडमधील डाकबंगला वैश्यभवनात आयोजित केलेल्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीमती राजश्री मोरे, तहसीलदार सुधीर सोनवणे, सर्व महसूल कर्मचारी, विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. भागवत म्हणाले की, सैनिक आपल्या देशाचे रक्षण करीत असतो. देशासाठी प्राण देण्यास कधीही तयार असणारा सैनिक कधीतरी सुट्टी घेऊन गावी येतो. मात्र अचानक त्याला बोलावणे येते. मग सैनिक आपली महत्त्वाची कामे टाकून देशरक्षणासाठी कर्तव्यावर जातो. त्यावेळी तो सैनिक असला, तरी तो भावनिक असल्याने आपली महत्त्वाची कामे कशी होणार, याची चिंता त्याला सतावत असते. ज्यावेळी तो निवृत्त होऊन गावी येतो, त्यावेळी सरकारदरबारी असणारी कामे प्राधान्याने मार्गी लागणे गौरवास्पद आहे. नागरिकांनीही त्याच्या देशसेवेची जाणीव आणि कदर करायला हवी,अशी अपेक्षाही श्री. भागवत यांनी व्यक्त केली.

भारत शक्तिशाली राष्ट्र आहे. भारतीयांना स्वतःची ताकद ओळखता आली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी एअर मार्शल हेमंत भागवत, तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते माजी सैनिकांच्याविधवा पत्नी, माता यांचा सन्मान करण्यात आला. माजी सैनिक, तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल, कर्मचारी असलेले माजी सैनिक यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page