सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारतात आपला व्यवसाय स्थापन करण्याच्या दिशेनं वेगानं काम करत आहे.
नवी दिल्ली- फॉक्सकॉन ही तैवानची सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारतात आपला व्यवसाय स्थापन करण्याच्या दिशेनं वेगानं काम करत आहे. कंपनीनं सोमवारी तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात १,६०० कोटी रुपये खर्चून मोबाईल कंपोनंट फॅसिलिटी उभारण्याची घोषणा केली होती. तर आता फॉक्सकॉननं कर्नाटकातील दोन प्रकल्पांसाठी ६०० मिलियन डॉलर्स किंवा सुमारे ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
फॉक्सकॉनने कर्नाटकातील वरीलपैकी एका प्रकल्पासाठी अमेरिकन उत्पादन कंपनी अप्लाइड मटेरिअल्ससोबत (Applied Materials) भागीदारी केली आहे. ६०० मिलियन डॉलर्स गुंतवणुकीच्या योजनेअंतर्गत, कंपनी ३५० मिलियन डॉलर्स किंवा सुमारे ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक फोन एन्क्लोजर प्रकल्पात करेल. या माध्यमातून सुमारे १२ हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. फॉक्सकॉन अॅपल आयफोनसह स्मार्टफोनसाठी केसिंग कंपोनंट्स तयार करण्यासाठी एक युनिट स्थापन करणार आहे.
चिप मेकिंग टूल्स प्लांट
फॉक्सकॉनच्या पुढील गुंतवणुकीबद्दल बोलायचं झाल्यास ६०० मिलियन डॉलर्सपैकी ते उर्वरित २५० मिलियन डॉलर्स किंवा २०६८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक प्लांट उभारणार आहे. ज्यामध्ये चिप बनवण्याच्या टूल्सचं प्रोडक्शन केलं जाईल. हा सेमीकंडक्टर उपकरण प्रकल्प अप्लाईड मटेरियल्सच्या सहकार्यानं पूर्ण केला जाईल. या माध्यमातून सुमारे १ हजार लोकांना रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लियू, कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे आणि उद्योगमंत्री एम.बी.पाटील यांच्या झालेल्या बैठकीनंतर या दोन्ही प्रकल्पांसाठीच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.
१३ हजार नोकऱ्या
अंदाजे ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कर्नाटकातील हे दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी फॉक्सकॉनसोबत लेटर ऑफ इंटेंटवर (LOI) स्वाक्षरी केली आहे. दोन्ही प्रकल्पांतून राज्यातील एकूण १३००० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.