मुंबई ,05 ऑगस्ट- बॉलीवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी इ सी एल फायनान्स कंपनी व एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या 5 जणांविरोधात कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीनं मानसिक छळ केल्याचा आरोप झाला होता. कंपनीच्या व्याजाचा दर,व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती.
नितीन देसाई प्रकरणात आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच एडलवाइज कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्यात कंपनीने सगळ्या बाजूंची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी केली होती. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.