🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | गोरखपूर | जानेवारी ३१, २०२३.
◼️ गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा अहमद मुर्तजा अब्बासाली विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गोरखनाथ मंदिरावर अब्बासीने हल्ला केला होता.
◼️ एनआयए व उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या घटनेचा तपास पूर्ण केला. अब्बासीविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्याच्याविरोधात आरोप निश्चिती झाली. अब्बासीने सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे याचा रितसर खटला चालला. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे व बेकायदेशीर कृत्य या आरोपांसाठी अब्बासीला न्यायालयाने दोषी धरले व मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात अब्बासी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करु शकतो.
◼️ गेल्या वर्षी ३ एप्रिलला ही घटना घडली. गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराबाहेरील पोलीस अधिकाऱ्यांवर अब्बासीने हल्ला केला. तो मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा धारधार शस्त्राने अब्बासीने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मंदिराला भेट देणार होते. त्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे योगी आदित्यनाथ हे मंदिराचे महंत आहेत. त्यांच्या निवासासाठी मंदिरात खोली देखील आहे.
◼️ अब्बासीवर काळ्या जादुचा प्रभाव होता, असे तेथीलच मदरशातील मौलाना इलियासी यांनी सांगितले होते. या मदशात अब्बासी जात होता. तर अब्बासी हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला होता. हा दावा डॉक्टरांनी फेटाळून लावला होता. त्यासाठी अब्बासीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.
◼️ मात्र अब्बासीने अतिरेक्यांच्या सांगण्यावरून ‘जरीमा’ नावाचे जिहादी app तयार केले होते. अरबी भाषेत जरीमाचा अर्थ ऑपरेशन असा होता. अब्बासी अतिरेकी संघटना इसिसमध्ये सहभागी होणार होता. हे सर्व तपासात समोर आले. त्याच्याविरोधात देशाविरूद्ध युद्ध पुकारणे व बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यातंर्गत खटला चालला. या गुन्ह्याचे सबळ पुरावे सादर झाल्याने विशेष न्यायालयाने अब्बासीला फाशीची शिक्षा सुनावली.