
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आता श्रद्धाचा शवविच्छदेन अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर करवतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले होते. ते तुकडे आफताब रोज जंगलात फेकत होता. महारौलीचं जंगल आणि गुरूग्राम या ठिकाणी तो हे तुकडे फेकत होता. आफताबला अटक केल्यानंतर जे हाडांचे तुकडे त्या ठिकाणी मिळाले त्या हाडांवरून शवविच्छेदन अहवाल काढण्यात आला.
पोलिसांना जंगलात २३ हाडं मिळाली
आफताबला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने कुठे कुठे श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकले ते पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांना एकूण २३ हाडं मिळाली. यावरूनच शवविच्छेदन अहवाल तयार करण्यात आला. यामध्येच हा धक्कादायक खुलासा झाला आहे की आफताबने करवतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. या प्रकरणी पोलीस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोर्टात चार्जशीट दाखल करणार आहेत.
दिल्ली पोलिसांनी आफताब पूनावालाची केली कसून चौकशी
श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी आफताब पूनावालाला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. या दरम्यान पोलिसांना महारौली आणि गुरुग्राम येथील जंगलातून एकूण २३ हाडं मिळाली. या हाडांचं शवविच्छेदन करण्यात आलं. एम्स रूग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाने ही हाडं तपासली ज्यानंतर हे कळलं आहे की आफताबने करवतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले.
श्रद्धाच्या हाडांवर मिळाल्या करवतीने कापल्याच्या खुणा
जेव्हा कोणतीही गोष्ट करवतीने कापली जाते तेव्हा त्याची खूण मागे राहतेच. कारण कापला जाणारा भाग काहीसा खडबडीत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाच्या हाडांवर अशाच खुणा मिळाल्या आहेत. एकूण २३ हाडाचं निरीक्षण केल्यानंतर हा अहवाल देण्यात आला आहे की श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करवतीने करण्यात आले आहेत.
कट रचून आफताबने श्रद्धाला संपवलं
श्रद्धा आफताब सोबत सुखी संसाराची स्वप्न पाहात होती तिकडे आफताब तिच्या हत्येचा कट रचत होता. या दोघांमध्ये बऱ्याचदा खटके उडत होते. मात्र प्रेमी युगुलांमध्ये वाद होणं, खटके उडणं हे काही विशेष नाही. आफताब माफी मागायचा, तिला समजवायचा ती ऐकायची. मात्र या सगळ्यामागे आफताब आपल्या हत्येचा कट रचतोय याचा साधा संशयही श्रद्धाच्या मनाला शिवला नाही. अनेक महिने व्यवस्थित कट रचल्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. Bumble या डेटिंग अॅपवर श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला या दोघांची ओळख झाली होती. २०१८ मध्ये या दोघांची ओळख झाली. डेटिंग अॅपच्या मआध्यमातून २०१९ ला दोघं भेटले. त्यानंतर लिव्ह इन मध्ये राहात होते. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब पूनावालाने ही कबुली दिली आहे की रक्त स्वच्छ कसं करायचं हे आफताबने गुगलवर शोधलं होतं. तसंच माणसाच्या शरीराचे तुकडे कसे करायचे हेदेखील त्याने शोधलं होतं. पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना या सगळ्याची सर्च हिस्ट्री मिळाली होती. आता श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे तुकडे करवतीने केले होते अशी माहिती समोर आली आहे.