ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) मुंब्रा आणि कळवा येथे पारसिक डोंगराच्या पायथ्याशी तसेच डोंगरावर झोपड्या तयार करून राहणाऱ्या ७२५ कुटुंबांना महापालिका आणि वन विभागाने नोटीसा बजावून स्थलांतराचे आवाहन केले आहे. मुंब्रा बाह्यवळण, कळवा येथे अनेकदा दरड कोसळल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रायगड येथील इरशाळवाडीमध्ये झालेल्या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर ठाण्यातील १४ दरडप्रवण क्षेत्रांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
दरड प्रवण क्षेत्रात सर्वाधिक मुंब्रा आणि कळवा भागातील क्षेत्राचा सामावेश आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील मुंब्रा देवी परिसरात दरड कोसळल्यानंतर महापालिका आणि वनविभागाने खरबदारी घेत येथील ४५ कुटुंबांचे स्थलांतर केले. तसेच अतिजोखीमीच्या भागात असलेली ९ घरे बंद केली. आता महापालिकेने कळवा आणि मुंब्रा भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. Thane महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत येथील ७२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात कळव्यातील ५०० हून अधिक आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गालगतच्या २२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या. तसेच घरोघरी जाऊन येथील रहिवाशांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापर्यंत इतरत्र रहावे असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. वनविभागाने देखील कळवा – मुंब्रा भागातील घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, कारगिल कोंडा भागात सर्तक राहण्याच्या सुचना करणारे फलक बसविले आहेत. तसेच येथील ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
जाहिरात