ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव हद्दीतील तलाव, विकास आराखड्यातील रस्त्यांमध्ये बांधण्यात आलेल्या चाळीतील रहिवाशांना ग प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. जमीन मालकी, बांधकाम परवानगीच्या कागदपत्रांसह रहिवाशांना सुनावणीला हजर राहण्याचे आदेश नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
याशिवाय आयरे गाव हद्दीतील विकास आराखड्यातील रस्ते, बाह्य वळण रस्त्याचा भाग यांच्या सीमारेषा नगररचना विभागाकडून निश्चित करुन घेऊन विकासाला अडथळा ठरणाऱ्या सर्व बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, असे ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी सांगितले. आयरे गाव हद्दीत पालिकेचे आराखड्यातील रस्ते, इतर सुविधा आरक्षणांची निश्चित नगररचना विभागाकडून केली जाईल. या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित निश्चितीच्या ठिकाणी सीमांकन केले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले.
आयरे गाव हद्दीतील तलावात बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. तलाव बुजवून चाळी बांधण्यात आल्याने हा प्रश्न विधीमंडळात लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. पालिका प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. मागील आठ वर्षाच्या कालावधीत आयरे गाव हद्दीत पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भूमाफियांनी आठ हजाराहन अधिक बेकायदा चाळी बांधल्या. या भागातील पालिकेची आरक्षणे, विकास आराखड्यातील रस्ते बेकायदा चाळी बांधून हडप केले.
गेल्या वर्षापासून आयरे गावातील तानाची केणे, अंकुश केणे या भागातील बेकायदा १४ इमारती, बेकायदा चाळींविषयी ग प्रभागात सातत्याने तक्रारी करत होते. तत्कालीन ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही अशी वेळकाढू भूमिका घेऊन या बांधकामांना अभय देत होते. आता साहाय्यक आयुक्त कुमावत यांना बेकायदा चाळींमधील रहिवाशांना नोटिसा देणे, तलाव ठिकाण शोधणे ही कामे सुरू केली आहेत.
आयरे भागातील काही बेकायदा बांधकामांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने भूमाफियांच्या सांगण्यावरुन गुंतवणूक केली होती. माफियांनी संबंधित अधिकाऱ्यालाही गुंतवणुकीतील रक्कम परत न करता फसविले असल्याची चर्चा शहरात आहे. आयरे गावातील बेकायदा बांधकामांच्या विषयावर ‘लोकसत्ता’ने सातत्याने लिखाण केल्याने पालिकेसह शासनाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली आहे.
“ आयरे हद्दीतील तलाव, विकास आराखड्यातील रस्ते यांच्या हद्दी निश्चित नगररचना विभागाकडून करुन घेण्यासाठी पत्र देत आहोत. या विभागाने हद्द, सीमांकन करुन दिले की सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जातील.” -संजय कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.
जाहिरात