मुंबई , 25 जुलै – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला. दोघे प्रेमाने एकमेकांना मिठी मारत असतानाच्या या फोटोने अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र मी शरद पवारांसोबत व पक्षासोबत ठाम आहे. कोणीही गैरसमज निर्माण करू नका, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी केले आहे.
अजित पवारांनी बंड करून भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या; पण गेल्या आठवड्यापासून अचानक संघर्ष थांबला असून अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांनी दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे वेगवेगळे तर्क व्यक्त होत असताना काल विधान भवनाच्या पाय-यांवर तटकरे व जयंत पाटील समोरासमोर आले. हास्यविनोद करीत त्यांनी गळाभेट घेतली. हा फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाला त्यामुळे अखेर जयंत पाटील यांना खुलासा करावा लागला.
सुनील तटकरे वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे. विधिमंडळात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकांना भेटू शकतो. आमचे व्यक्तिगत संबंध असू शकतात त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेच कारण नाही. माझे इतर पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहे मात्र याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मी शरद पवारांसोबत ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठाम आहे. शरद पवार सांगतील तीच आमची दिशा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आता अजित पवारांसोबत गेलेले ६ आमदार हे माझ्या सोबत लॉबीत बसलेले होते. ३ आमदारांनी माझ्या सोबत जेवण केले. याचा अर्थ काही वेगळा होत नाही त्यामुळे कोणीही गैरसमज निर्माण करू नका, असेही त्यांनी सांगितले.