
शिवसेनेकडून सेटलमेंट केल्याच्या खोट्या आरोपांना मुंडेंकडून चोख उत्तर, २० जुलै रोजी सहाय्यक आयुक्त विरोधात आंदोलन
दिवा : दिव्यात मोठ्या प्रमाणात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामामुळे सोयी सुविधांवर तान येत असून भाजपचे रोहिदास मुंडे २० जुलै रोजी याविरोधात आंदोलन करणार आहेत. याचाच भाग म्हणून मुंडे यांनी दिव्यातील सुरू असणाऱ्या ११० अनधिकृत बांधकामांच्या फोटोंचा अल्बम आयुक्तांना भेट दिला आहे.
तक्रारी करूनही पालिकेला अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत याबद्दल मुंडे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दिव्यात बेमालुपणे सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा बसावा या उद्देशाने दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त व ठाणे महानगरपालिका प्रशासन यांना सदर बांधकामावर कारवाईसाठी मागणी करताना रोहिदास मुंडे यांनी २० जुलै रोजी महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र दिवा शहरात सुरू असणाऱ्या अधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई न करता स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामध्ये महापालिका प्रशासन व शिवसेनेचे माजी उपमहापौर यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे. कितीही तक्रारी केल्या तरी अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची नाही असा निर्धार निगरगट्ट झालेल्या महापालिका प्रशासन आणि माजी उपमहापौर यांनी केलेला आहे. परिणामी या आंदोलनाच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी २० जुलै रोजी महापालिका प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा रोहिदास मुंडे यांनी या आधीच दिला आहे. मात्र महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांची भेट घेत सध्या सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या फोटोंचा अल्बमच आयुक्तांना भेट देत कारवाईची मागणी केली आहे. अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून पैसा गोळा करून अधिकारी आणि शिवसेनेचे माजी उपमहापौर हे आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा सणसणीत आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे यासारख्या पायाभूत सुविधांना मुकावे लागत असून केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी धोरणाला ठाणे महापालिका हरताळ फासत असल्याचा आरोप भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
२० जुलै रोजी ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि आर्थिक हितसंबंधातून अनधिकृत बांधकामांना पाठबळ देणाऱ्या विरोधात आपण धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. मी महापालिका प्रशासनाच्या विरोधात वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी आंदोलन करत असताना शिवसेनेच्या आदेश भगत यांच्या पोटात का दुखते?आणि ते माझ्या विरोधात आंदोलन का करणार आहेत?याच्यातच आर्थिक हितसंबंध याच लोकांचे गुंतले असल्याचे स्पष्ट होते, असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्यांसाठी आजच संपर्क करा
