सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथून हरकुळ-बुद्रुककडे जात असताना भरधाव दुचाकी एस.टी. बसवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सागर मारुती घाडीगावकर (वय 27, रा. हरकूळ-बु. बोंडकवाडी) हा जागीच ठार झाला.तर दुचाकीवर मागे बसलेला सुनील सूर्यकांत ठाकूर (45, रा. हरकूळ-बु.काळेथरवाडी) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, उपचारापूर्वीच मयत झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी 5.15 वा. च्या सुमारास कणकवली-कनेडी मार्गावर कणकवली- शिवशक्तीनगरनजीक घडला.
कणकवली आगाराचे चालक शिवाजी ढोणे हे हरकूळ बुद्रुक-भटवाडी-कणकवली बसफेरी घेऊन येत असताना शिवशक्तीनगर फाट्यानजीक कणकवलीकडून येणारे दुचाकीस्वार सागर घाडीगावकर आणि सुनील ठाकूर यांच्या दुचाकीची जोरदार धडक एस.टी.बसला चालकाकडील बाजूने बसली. ही धडक एवढी भीषण होती की, सागर घाडीगावकर आणि सुनील ठाकूर या दोघांच्या डोक्याला गंभीररीत्या दुखापत झाली. तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना
स्थानिकांनी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले. पण सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनील ठाकूर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाला.