
गुहागर : गुहागर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना तालुक्यातील पालशेत येथील पुलाजवळ पूरस्थिती निर्माण होण्याची स्थिती तयार झाली होती. मात्र जेसीबीच्या सहाय्याने बार्जशेजारील वाळू काढल्याने नदीची वाट मोकळी होवून सायंकाळी ३.१५ वाजल्यापासून नदीचे पाणी कमी होवू लागल. परिणामी पालशेत पूर स्थितीपासून वाचले. दरम्यान दुसरीकडे नदीच्या मुखावर अडकून पडलेले बार्ज किनारपट्टीवर ओढून घेवून त्यानंतर त्याचे तुकडे केले जाणार आहेत.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी महाकाय बार्ज वाहून आले होते. यामुळे पालशेत गावातून वाहणार्या नदीचे मुख बंद झाले होते. नदीच्या मुखाजवळ बार्ज अडकून पडल्याने नदीतील अतिरिक्त पाणी समुद्रात जाण्यासाठी वाट बंद झाली होती. बुधवारी मुसळधार पावसामुळे पालशेत नदीचे पात्र पूर्ण क्षमतेने भरले होते. पालशेत पुलावरून पाणी जाण्यास काही अंतर शिल्लक असतानाच येथील ग्रामस्थांनी तातडीने गुहागर महसूल कार्यालयाजवळ संपर्क केला. तहसीलदार प्रतिभा वराळे, सर्क अधिकारी सचिन गवळी, तलाठी दीपक ताठेवाड यांनी बार्ज कटींग करण्यासाठी व बाजूला करण्यासाठी आलेल्या कंपनीला जेसीबीच्या सहाय्याने बार्ज शेजारील वाळू काढण्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्या कंपनीच्या अधिकार्यांनी बार्ज शेजारील वाळू काढल्याने नदीपात्रातील पाणी कमी होवून पूरस्थिती टळली.