हक्काच्या बसस्थानकाअभावी दिवेकर प्रवाशी चिखलात तासनतास उभे
दिवा ( सचिन ठिक ) दिव्यातून ठाणे आणि नवीमुंबईकडे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाश्याचे भर पावसात हाल होत असून हक्काचा बसस्थानक नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे.दिवेकर नागरिकांना दिवा महोत्सव मैदानाजवळ पावसामुळे तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र असून पालिका प्रशासनाने यावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस दिवा चौकात येतात.प्रवाशी संख्या लक्षात घेता या ठिकाणी नागरिकांना रांगेत उभे राहण्यासाठी व्यवस्था नाही.पर्यायी जागा म्हणुन दिवा महोत्सव मैदानाजवळ उभे राहूुन बस पकडण्यास सांगितले जाते.मात्र गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे याठिकाणी मोठा पाणी साठा झाला आहे.यामुळे येथे बस थांबणेही कठीण झाले आहे.प्रवाश्यांना बस पकडण्यासाठी कसरत करावी लागत आहे.बाजूला चायनियजच्या दुकानांचा कचरा आणि बियरच्या बाटल्यांचा कचराही पायाखाली तुडवत प्रवास करावा लागतोय अशी दयनिय परिस्थिती आहे.
परिणामी दिवेकर नागरिकांचे हाल होत आहेत.अश्यावेळी कोणतीही शिस्त नसल्याने नागरिक बस पकडण्यासाठी झटापटी करीत आहेत.महिलांना बसमध्ये शिरणेही कठीण होत आहे.पावसामुळे बस लेट झाल्यास सकाळच्या दरम्यान मोठी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होत आहे.दरम्यान हक्काचे बसस्थानक नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत असून लवरकच बसस्थानकाची निर्मिती करावी अशी मागणी आता दिवेकर नागरिक करीत आहे