महाराष्ट्रात आता मान्सूनची प्रतिक्षा संपली असून राज्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज पुणे आणि मुंबईतही सकाळपासून पाऊस सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशात पुढच्या २४ तासांत काही शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र : महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पण मुंबईत झालेला पाऊस हा मोसमी पाऊस होता का? यासंदर्भात अद्याप हवामान खात्याकडून कोणतेही अपडेट देण्यात आले नाही. मात्र, येत्या २४ तासांत मान्सून मुंबईला भिजवणार, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झालं आणि बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रगतीवर मोठा परिणाम झाला. मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल मान्सूनने विदर्भात हजेरी लावल्यानंतर आता पुढे सरकरत पुण्यातही पाऊस झाला. यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
येत्या ३-४ दिवसांत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
पालघर ठाण्यामध्ये यलो अलर्ट…
हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला मंगळवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, शनिवार ते मंगळवार रायगड, रत्नागिरी इथे विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही सोमवारपर्यंत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, असे म्हणता येईल.
ठाणे जिल्ह्यात मान्सून बरसला…
आज सकाळपासून ठाण्यात पावसाच वातावरण निर्माण झाले त्यासोबतच पाऊस गेल्यानंतरही ढगाळ वातावरण शहरात पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनच आगमन झाल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या शहरात पावसाची सुरुवात झाली आहे. विदर्भाच्या भागात देखील पावसाला चांगली सुरवात झाली आहे. तर येत्या ४८ तासात राज्यातल्या सगळ्याच भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
जाहिरात