विरोधकांची बैठक म्हणजे फोटोसेशन असल्याची टीका करतानाच गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे ऐक्य जवळपास अशक्य असून लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसेल असे म्हटले आहे. ते येथे आयोजित सभेमध्ये बोलत होते. राहुल यांना प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याची सवयच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
शहा म्हणाले की, ‘‘ पाटण्यामध्ये सध्या फोटोसेशन सुरू आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा संदेश देण्यासाठी ही मंडळी एकवटली आहेत. भाजप पर्यायाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि मोदींना आव्हान देण्याचा त्यांचा विचार आहे. या सगळ्या विरोधी नेत्यांनी मी सांगू इच्छितो की, तुमचे ऐक्य जवळपास अशक्य आहे आणि जरी हे विरोधक एकत्र आले तरीसुद्धा मोदी हे २०२४ मध्ये ३०० पेक्षा अधिक जागा मिळवत विजयी होतील.’’
पंतप्रधान मोदींच्या अमेरिकी दौऱ्यावर भाष्य करताना शहा म्हणाले की, ‘‘ अंतराळ संरक्षण आणि सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये खूप सारे करार होऊ घातले आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणुकीची तयारी चालविली आहे. मोदींच्या कार्यकाळामध्येच भारताची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून थेट पाचव्यास्थानी पोचली आहे. राम मंदिराचा मुद्दा असो की ३७० वे कलम किंवा तोंडी तलाकचा विषय असो राहुल यांना प्रत्येक गोष्टींवर टीका करण्याची सवय आहे.’’
बारा लाख कोटींचा भ्रष्टाचारदेशातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी यासाठी भक्कम पायाभरणी केली आहे. मागील ‘यूपीए’च्या कार्यकाळामध्ये बारा लाख कोटी रुपयांचे भ्रष्टाचार झाले होते. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, ‘‘ जम्मू काश्मीरमध्ये ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला असून त्याची जबाबदारी कोण घेईन? जम्मू- काश्मीरमध्ये आतापर्यंत केवळ तीनच घराण्यांनी राज्य केले पण ३७० व्या कलमामुळे येथील विकास थांबला होता.’’
जे.पी. नड्डा यांची बैठकीवर जोरदार टीकामाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या नेत्यांना आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात टाकले होते तेच आता त्यांच्या नातवाचे स्वागत करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विरोधकांवर केली. यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा विरोधकांच्या बैठकीच्या दिशेने होता.भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, आज जगभरामध्ये पंतप्रधान मोदी यांची स्तुती होत असल्याचे काँग्रेसच्या पचनी पडताना दिसत नाही. मोदींनी घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध करत देशात विकासाचे राजकारण सुरू केले.’’