मुंबई : यंदाचा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला. पण यानंतर पावसानं सगळ्याच राज्यांमध्ये लेटमार्क लावला. आज महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता मुंबई पुण्यात पावसाच्या सरी बरसतील अशी आशा होती. पण मुंबई आणि पुणेकरांना मात्र पावसाची आणखी वाट बघावी लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २५ जूननंतर शहरांमध्ये मान्सून सक्रिय होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात रखडलेल्या मान्सूनने आज विदर्भात जोरदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस सावकाश पुढे सरकेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. खरंतर, राज्यात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. पण यंदा मात्र ११ जूनपासून तो लांबणीवर आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह थांबला होता. परंतु, आता मान्सूनची प्रगती सुरू झाली आहे. पण असं असलं तरी मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होण्यासाठी आणखी २ दिवस घेणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांमध्ये आज मान्सूनने हजेरी लावली. यामुळे अमरावती, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. यामुळे पावसाची वाट बघणारा बळीराजा मात्र सुखावला आहे. अशात हवामान खात्याकडून २५ तारखेपासून पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिकच्या घाट परिसरामध्ये येलो अलर्ट दिला आला तर २७ जूननंतर घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.