चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी आरवली ते वाकेडदरम्यान जुन्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे ९० किलोमीटरच्या टप्प्यात सुमारे ४५ किलोमीटर रस्ता डांबरी आहे. नादुरुस्त रस्त्यांचे पॅच डांबरी करण्यात आले असून त्यावर सहा कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे काँक्रिटीकरण पूर्ण झालेला आणि डांबरी दोन्हीही रस्त्यांचे भाग गणेशोत्सवामध्ये वाहतुकीस सज्ज ठेवण्यात आले आहेत.
नवीन ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर आरवली ते वाकेड रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती मिळाली आहे. अवघड अशा निवळी घाटामध्ये एका भागातील काँक्रिटीकरणही करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी वारंवार बैठका घेत कामामध्ये ठेकेदारांना येणार्या अडचणी सोडवण्यावर भर दिला आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे या ९० किलोमीटरच्या टप्प्यातील रस्ता खराब झाला होता. यावरून वाहने हाकतानाही अडचणी निर्माण होत होत्या. यावर पर्याय म्हणून खराब झालेल्या डांबरी रस्त्याचे पॅच पुन्हा दुरुस्त करण्यावर भर दिला आहे.