पुणे : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन प्रवासी महिलेला इच्छित स्थळी घेऊन न जाता भलत्याच ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. घाबरलेल्या महिलेने रिक्षातून उडी मारली, ‘जीपीएस’मुळे पतीने पाठलाग केला. या वेळी रिक्षा पलटी झाली आणि रिक्षाचालक फरार झाला होता. ही घटना रवी पार्क सोसायटी व ४८ सोसायटी यांच्या मधील रस्त्यावर मंगळवारी पहाटे ३.३० ते चार वाजण्यादरम्यान घडली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून नंतर चालकाला अटक करण्यात आली आहे.
अनिकेत मुंजाळ (वय २४, रा. फुरसुंगी) या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडितेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला फुरसुंगी येथील आयटी कंपनीत कामाला आहे. रात्री साडेतीन वाजता काम सुटल्यानंतर, महिलेने ‘उबर ॲप’वरून रिक्षा ‘बुक’ केली, तेव्हा रिक्षा प्रवासी महिला रिक्षात बसली. रिक्षाचालकाने ‘माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आहे, तुमच्या मोबाइलचे ॲप सुरू करा, जेवढे पैसे होतील तेवढे मला द्या,’ असे सांगून रिक्षा फुरसुंगी येथील भोसले व्हिलेजमधून पुढे नेली. इच्छित ठिकाणी सोडण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नेले जात असल्याचे महिलेच्या लक्षात आले. चालक रिक्षा थांबवत नसल्याने महिलेने मित्राला व पतीला फोन करून सांगितले. अंधारात रेल्वे मार्गाशेजारी ‘लिटल फ्लॉवर स्कूल’शेजारी रिक्षा थांबली असता, रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला. त्या वेळी महिलेने रिक्षाचालकाच्या हाताला चावा घेतला, तेव्हा चालकाने महिलेच्या पाया पडून ‘तुम्हाला घरी सोडतो, मला माफ करा,’ असे म्हणून महिलेला रिक्षात बसवले आणि काळेपडळ रेल्वे फाटकापर्यंत नेले. काळेपडळचा ओळखीचा परिसर पाहून महिलेने रिक्षातून उडी मारली, तेवढ्यात पाठीमागून महिलेचे पती ‘जीपीएस’द्वारे पाठलाग करत आले. त्यांनी महिलेस कारमध्ये बसवून त्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात रिक्षा जोरात पलटी झाली.