मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका, या प्रकरणी ठोठवला दंड

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यांतील वाद जळगाव जिल्ह्यात नाही तर राज्यात चर्चेत असतो. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात. एकनाथ खडसे यांनी एका प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. त्या प्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड केला आहे.

काय आहे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्यात सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरु आहे. पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने 500 रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही दिली, अशी माहिती एकनाथ खडसे यांचे वकील भूषण देव यांनी दिली.

कधी होणार पुढची सुनावणी

जळगाव जिल्ह्यातील या बहुचर्चित खटल्याची पुढील सुनावणी 21 जून रोजी ठेवली आहे. युती सरकारमध्ये खडसे बारा खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात एकनाथ खडसे यांनी 2016 मध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची आता नव्याने सुनावणी सुरू झाली आहे.

या खटल्याची सुनावणी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी प्रितम नायगावकर यांच्या कोर्टात सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे साथ धरली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटील खडसे यांच्यांवर टीकेची एकही संधी शोधत नाही. तिन्ही नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु असतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात या तिन्ही नेत्यांच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा असते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page