दादर : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास सुखद होण्यासाठी मध्य रेल्वेने सरकते जिने-लिफ्ट बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने हे सरकते जिने लावल्याने प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी उलट त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
असाच प्रकार दादर रेल्वे स्थानकांवर घडला असून इथे चुकीच्या पद्धतीने सरकते जिने बसविल्याने याचा वापर करताना प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडत आहे. एलफिस्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन्ही मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सरकते जिन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. त्यानुसार विविध उपनगरीय रेल्वे स्थानकावर सरकते जिने बसवण्यात आले.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर एकूण १११ सरकते जिने कार्यान्वित झाले आहे. याचा फायदा आजारी, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला व अपंग प्रवाशांना मोठा फायदा झाला आहे. इतर प्रवाशांकडूनही या जिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु, सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या मध्यवर्ती दादर स्थानकात फलाट क्रमांक 3-4 वरचा सरकता जिना चुकीच्या पध्दतीने बसवला आहे. नियमानुसार, फलाटावर सरकत्या जिनाच्या उजव्या बाजून प्रवासी उतरतात तर डाव्या बाजूने प्रवासी चढतात. मात्र,इथले फॉर्मेशन चुकल्यामुळे प्रवाशांना उजव्या बाजूने सरकत्या जिन्यावर चढाव लागत तर डाव्या बाजूने या जिन्यावरुन प्रवासी उतरतात. रेल्वे प्रशासनाच्या चुकीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
कचरा कुंडी ? रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या सरकत्या जिना दोन्ही बाजूने पॅक केला आहे. मात्र बाजूला थोडी मोकळी जागा सोडली आहे.याचा फायदा घेत काही प्रवासी या मोकळ्या जागेत कचरा फेकतात तर काहीजण गुटखा, मावा खाऊन तो भाग रंगवत आहेत. या भागाची स्वछता करताना रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. सरकते जिने लावताना नियोजनाचा अभाव असल्याचे मत स्वछता रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. कारवाई होणार एका बाजूला रेल्वे प्रशासन सरकत्या जिन्यासापख्या सोई सुविधा देत असताना दुसऱ्या बाजूला काही प्रवाशांकडून अनावधानाने किंवा मुद्दामुन ”आपत्कालीन स्टॉप” बटण दाबण्याचा घटना दररोज घडत आहेत. गर्दीच्या दादर, वडाळा, कल्याण, ठाणे या रेल्वे स्थानकात मागील काही दिवसात या घटना वारंवार समोर आल्या आहे.
दिवसभरातून सरासरी या प्रकारच्या 10 ते 15 तक्रारी रेल्वेकडे येत आहेत. यांसंदर्भात काही रेल्वे अधिकाऱ्यांनी सकाळला सांगीतले की अनेकदा रेल्वे स्थानकांवरील हमाल, त्यांना भाडे मिळाले या उद्देशाने स्टॉप बॅट दाबतात. त्यामुळे सरकते जिने बंद पडतात. मात्र, रेल्वे सिसिटीव्हीच्या माध्यमातून या प्रकाराकडे लक्ष देणार असून संबधीतावर कारवाई करण्याचा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे.