गणपती आणि होळी हे सण कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबईत राहणारे चाकरमानी या सणांसाठी हमखास सुट्टी घेतात. पण दरवेळेस गावी जाताना त्यांना रस्ते मार्गाचा अडसर येतो. आता कोकणवासीयांची गणपतीला गावी जाण्याची तयारी सुरु आहे
दबाव वृत्त : गणपती आणि होळी हे सण कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबईत राहणारे चाकरमानी या सणांसाठी हमखास सुट्टी घेतात. पण दरवेळेस गावी जाताना त्यांना रस्ते मार्गाचा अडसर येतो. आता कोकणवासीयांची गणपतीला गावी जाण्याची तयारी सुरु आहे. त्याचवेळी त्यांना मुंबई-गोवा महार्गाच्या दुरावस्थेची चिंता वाटू लागली आहे. दरम्यान यासंदर्भात आता महत्वाची अपडेट समोर आली आहे.
आज मुंबई गोवा मार्गाच्या विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी मुंबई गोवा मार्गासंदर्भातील उपाययोजना तातडीने करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यंदा 19 सप्टेंबरला गणेश उत्सव आहे. मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातील. त्यांच्या प्रवासात अडथळा नको म्हणून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश रवींद्र चव्हाण यांनी दिले. गणेशोत्सवापुर्वी मुंबई-गोवा हायवेवरील सिंगल लेन सुरु करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यामुळे महामार्गावरील पूर्वी आणि आता काय फरक आहे ते तुम्हाला कळेल, असेही ते म्हणाले.
आरोली ते काटे व काटे ते खेड येथील रस्त्यांचे काम काही प्रमाणात संथगतीने सुरू आहे. यासंदर्भातीन अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. याबाबत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या कामाला विलंब का होतोय? यामागची कारणे काय आहेत? त्याबाबतची कारणे त्यांनी उपस्थित अधिकार्यांना विचारली.
या कामांमध्ये तांत्रिक व आर्थिक निधीबाबतच्या ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल. परंतु 30 जूनपर्यंत या मार्गाची किमान एक बाजू तरी सुरू करण्यात यावी अशा सूचना चव्हाण यांनी केल्या.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी बारसू प्रकल्पावरदेखील भाष्य केले. बारसु प्रकल्प विरोधासाठी आंदोलन सुरु आहे. प्रकल्प व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असे ते म्हणाले. तसेच या प्रकल्पचा फायदा सर्वांनाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.