महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात? : अतुल लोंढे

Spread the love

फाईव्ह स्टार हॉटेलमधले जेवण मागवून भाजपाची ‘टिफिन नौटंकी’.

मुंबई – भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत. भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता महागाईने एकवेळचे जेवणही करु शकत नाही आणि भाजपा नेते मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण मागवून टिफीन बैठका घेण्याची नौंटकी करत आहेत, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. 

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपाने ‘चाय पे चर्चा’ नंतर आता ‘टिफिन बैठकी’चा नवा फंडा आणला आहे. नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्ष झाल्यानिमित्त भाजपाने खायचा हा नवा फंडा आणला आहे. ९ वर्षे भाजापाने भ्रष्टमार्गाने खा-खा खाल्ले तरीही त्यांना पुन्हा खायचेच डोहाळे लागले असून टिफिन बैठकांच्या नावाखाली मस्त पार्ट्या झोडत आहेत. खाद्यतेल ८० रुपयांवरून २०० रुपये लिटर, आटा २८ रुपयांवरून ४० रुपये किलो, दूध ४० रुपयांवरून ६० रुपये लिटर, डाळी १५० रुपये किलो तर गॅस सिलिंडर ४५० वरुन १२०० रुपये झाले असल्याने सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. रोजगार घटत आहेत, शेतमालाला भाव नाही. आणि ‘९ वर्षे सेवा, सुशासन आणि गरिब कल्याणाची’ असे म्हणत भाजपा गरिबांची थट्टा करत आहे. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे शेतमालाला हमी भाव देण्याचे आश्वासन देणारे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही परंतु आत्महत्या मात्र दुपटीपेक्षा जास्त वाढल्या आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, तरुणांच्या हाताला काम नाही, गरिबांची संख्या मोदी सरकारच्या काळात वाढली आणि आता ८० कोटी जनतेला मोफत धान्य देत असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. १४० कोटी लोकसंख्येतील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणे हे अभिमानाची नाही तर लाजीरवाणी बाब आहे, मोदी सरकारने ८० कोटी लोकांना गरिब केले. आणि वरून गरिब कल्याणाच्या बाता मारत आहेत. मोदी सरकारच्या काळात जनता उपाशी असून भाजपावाले मात्र तुपाशी आहेत, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page