मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार होऊ झाला तर मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना अमित शाह यांनी परवाच्या भेटीत दिल्याची माहिती आहे. अमित शाह यांनी या मंत्र्यांना घेऊ नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजावल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुटुंबासह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कुटुंबासह गेले असतील. तिकडे बर्फ पडत आहे. बर्फाची मजा काही वेगळीच असते. इकडे उन्हाळा आहे, डोकं शांत करायला गेले असतील. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्फोट होणार आहेत. अमित शाह यांनी त्यांना विस्ताराबाबत आदेश दिले आहेत. काही मंत्र्यांना वगळण्याचे हे आदेश आहेत. ते ओझं घेऊन मुख्यमंत्री कश्मीरला गेले असतील, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.