संत निवृत्तीनाथांची पालखी पारेगावकडे मार्गस्थ, तर मुक्ताबाईंची पालखी आज देऊळगाव राजाला मुक्कामी

Spread the love

नाशिक- निवृत्तीनाथांच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर जवळील दातली येथे पार पडले. असंख्य वारकऱ्यांनी दातली येथील हा रिंगण सोहळा अनुभवला. अन् आता वारकऱ्यांची पाऊले पुन्हा विठुरायाच्या ओढीनं पंढरीच्या दिशेनं चालू लागली आहेत. ‘सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी’ म्हणत मजल दरमजल करत संत निवृत्तीनाथांची पालखी खंबाळेहुन पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर मुक्ताबाईंची पालखी काल भरोसा फाट्यावर मुक्कामी होती, या पालखीचं आज सकाळी प्रस्थान अढेरा फाट्याकडे झाले आहे.

२ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी काल दातलीत आल्यानंतर आतापर्यंतचा सहावा रिंगण सोहळा पार पडला. हजारो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा लक्ष लक्ष नेत्रांनी साठवून घेतला. यानंतर पालखी मुक्कामी खंबाळेकडे मार्गस्थ झाली. काल रात्री उशिरा दिंडीचे खंबाळे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. रात्रीच्या विसाव्यानंतर पुन्हा संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आज पालखी खंबाळेहुन निघून पुढे पारेगावला विसावणार आहे.

पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल भरोसा फाट्यावर मुक्कामी होती. आज पालखीचा सहावा दिवस असून भरोसा फाट्यावरून मार्गस्थ होणार आहे. तर दुपारी अंढेरा फाट्यावरून पुढे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे मुक्कामी असणार आहे.

आज पालख्यांचा मुक्काम कुठे?
संत निवृत्तीनाथांची पालखी आज खंबाळे येथून पायमार्गाने भोकणी, मरळ, निरळ या गावावरून जाणार आहे. तर दुपारचे जेवण निरळं गावी होणार आहे. तर मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथांची दिंडी पारेगाव येथे जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज भरोसा फाट्यावरून पुढे मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर पुढे अंढेरा फाटा त्यानंतर अक्राळे पिंपरी येथील ग्रामस्थांकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण देऊळगाव राजा या गावी असणार आहे.

दातलीचे रिंगण पार पडलं!
निवृत्तीनाथांच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण सिन्नर जवळील दातली येथे पार पडले. वारकऱ्यांच्या मोठ्या उत्साहात हा नयनरम्य सोहळा पार पडला. हजारो वारकऱ्यांनी यावेळी हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालात फेर धरत गोल रिंगण लक्ष लक्ष डोळ्यांनी अनुभवले. तर संत मुक्ताबाई आषाढी पालखीने आतापर्यंत सहा दिवसात १२० किलोमीटरहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले आहे. तब्बल ६०० किमीचा पायी प्रवास असून २५ दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते. सर्वात लांब पल्ल्याची मुक्ताबाईंची दिंडी ओळखली जाते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page