मार्गदर्शक, गुंतवणूकदार आणि उद्योजकांचे आंतरराष्ट्रीय जाळे उभारण्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन.
🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 नवी दिल्ली | जानेवारी २९, २०२३.
▪️ केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक स्टार्टअप संबंधित व्यवस्था बळकट करण्यासाठी मार्गदर्शक, गुंतवणूकदार आणि उद्योजकांचे आंतरराष्ट्रीय जाळे उभारण्याचे आवाहन केले आहे. या जाळ्याने स्टार्टअप्सना पाठबळ आणि प्रेरणा दिली पाहिजे, संकल्पना, सर्वोत्तम कामकाजपद्धती आणि अर्थपुरवठा यंत्रणा यांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि संशोधन व विकासामधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक संघ म्हणून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. हैदराबादमध्ये जी-२० च्या स्टार्टअप २० एन्गेजमेंट ग्रुपच्या प्रारंभिक बैठकीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
▪️ नवोन्मेषाला पाठबळ देण्याची जबाबदारी कोणत्याही एका देशाची नाही आणि जगाच्या सर्वच भागांमध्ये स्टार्टअप संबंधित व्यवस्था उदयाला येण्यासाठी त्यांची जोपासना करण्याची सामूहिक जबाबदारी जगातील इतर देशांनी घेतली पाहिजे. जेणेकरून समावेशक, पाठबळ देणारी आणि जागतिक आव्हानांना तोंड देणारी शाश्वत जागतिक स्टार्टअप संबंधित व्यवस्था निर्माण होऊ शकेल, असे ते म्हणाले.
▪️ जी-२० चा यजमान देश म्हणून जागतिक स्टार्टअप संबंधित व्यवस्थेची प्रगती आणि क्षमता यांचे दर्शन घडवण्याचा भारताला अभिमान वाटत आहे, असे ते म्हणाले. नवोन्मेषावर भारताचा विशेष भर म्हणून भारताच्या जी-२० अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच स्टार्टअप-२० गटाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
▪️ पुढल्या दोन दिवसात होणाऱ्या चर्चांच्या माध्यमातून जी-२० नेत्यांना जागतिक स्टार्टअप क्रांतीवर चर्चा करण्यासाठी आणि तिचा प्रारंभ करण्यासाठी भक्कम कृतीयोग्य शिफारशी करण्याचा पाया घातला जाईल, ज्यामुळे आपल्याला जगभरात सर्वत्र स्टार्टअप्सच्या भवितव्यामध्ये खऱ्या अर्थाने बदल करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
▪️ स्टार्टअप-२० मध्ये जी-२० देश आणि निरीक्षक देशांमधून विशेष ९ निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील संघटनांचे आणि त्याबरोबरच भारतीय स्टार्टअप व्यवस्थेतील प्रतिनिधी सहभागी होतील.