नवी दिल्ली :- भाजप खासदार तसंच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह यांच्याविरोधात गेल्या महिनाभरापासून अनेक कुस्तीपटू आंदोलक दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलनाला बसले होते.त्यांच्या आंदोलनाची महिनाभरापासून सरकारने दखल न घेतल्याने त्यांनी नव्या संसद भवनाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरूवात केली.मात्र,त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आले.तसंच बळजबरीने ताब्यात देखील घेण्यात आले. दरम्यान या प्रकारानंतर या कुस्तीपटू आंदोलकांना आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आज संध्याकाळी ६ वाजता हे आंदोलक कुस्तीपटू उत्तराखंडमधील हरिद्वारला जाणार असून तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये मिळवलेली पदके विसर्जित करणार आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनियाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की,’पदके हेच आमचे जीवन असून ती गंगेत वाहून गेल्यावर आमच्या जगण्याला अर्थ उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसू. आम्ही ही पदके गंगेत विसर्जित करणार आहोत, कारण ती ‘गंगा मां’ आहे. आपण गंगा मातेला जितके पवित्र मानतो, तितक्याच पवित्रतेने आपण कठोर परिश्रम करून ही पदके मिळवली आहेत. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदकं ठेवण्याची योग्य जागा फक्त पवित्र माता गंगाच असू शकते’,असं ट्विट करत आज हि पदके आम्ही विसर्जित करत असल्याचे बजरंग पुनियाने म्हटलं आहे.
रविवारी एकिकडे नवीन संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं, तर दुसरीकडे या नव्या वास्तूसमोर आंदोलन करत असलेल्या पैलवानांची दिल्ली पोलिसांनी धरपकड केली. पैलवानांचे आंदोलन दडपल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. खरं तर पैलवानांवर दिल्ली पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत. मात्र,आता या कुस्तीपटूंनी आणखी आक्रमक होत राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेली पदके गंगेच्या पाण्यात विसर्जित करण्याचा पवित्रा घेतला आहे.