पुणे- राज्यातील वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागू लागले आहेत. येत्या १० जूनला जगद्गगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपुरच्या दिशेने होणार आहे.तर,११ जून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपुरच्या दिशेने होणार आहे. प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी देखील पुर्ण केली आहे.
पुणे,सातारा आणि सोलापुर या तिन्ही जिल्हाचे प्रशासन वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे. उष्माघाताचा धोका उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने औषध आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय करावी,असे आदेश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पालखी मार्गावर जागोजागी औषध व पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय फिरत्या शौचालयांची देखील सोय वारकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला आहे.या आराखड्यानुसार वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुबलक प्रमाणात फिरत्या शौचालयांचा पाठपुरवठा केला जाणार आहे.
प्राथमिक स्तरावर पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांची पूर्तता झाली आहे का? याचा प्राथमिक आढावा घेतला. यंदाची आषाढी वारी ही वारकऱ्यांना अध्यात्मिक आनंद देणारी असावी,यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे मत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.