नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणामध्ये आता फक्त ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची बचत व्हावी या दृष्टीने पाण्याचे नियोजन करताना दिसून येत आहे.पावसाळा कधी सुरू होईल याबाबत अनिश्चितता असल्याने नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणी योग्य पद्धतीने वापरलं जावं यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. पाण्याचा अनावश्यक वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असून याबाबतची आगाऊ ताकीद देखील महापालिकेने नागरिकांना दिली आहे.
नवी मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात गाड्या धुणे, नळ चालू ठेवणे, तसेच पाण्याच्या टाक्या ओवर फुल करणे, असे प्रकार सर्रास घडताना पाहायला मिळत आहे.असे प्रकार थांबवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आता कारवाईचा बडगा उभारणार असून पाणी बचत करण्याच्या सुचना देखील नागरिकांना देणार आहे.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेकडून अनेक सोसायट्यांवर सर्रास पाणी वाया घालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून जवळपास ३३६ सोसायट्यांना नोटीसा देखील पाठवण्यात आल्या आहेत. कारवाई करण्यात आलेल्या सोसायट्यांमध्ये वाशीमधील ७५ सोसायटी, कोपरखैरणे मधील ५५ सोसायटी, तुर्भेमधील १० सोसायटी, बेलापूर ६० सोसायटी, नेरूळमधील १५, घणसोलीमधील ३०, ऐरोलीमधील ८, दिघामधील ८० सोसायट्यांचा समावेश आहे. नवी मुंबईकरांना पाणी वापरण्यासाठी पालिकेने पाणीपुरवठा ठरवून दिलेला आहे. त्यामुळे जास्त पाणीपुरवठा वापरल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. अशात अनावश्यक पाणी वापरणाऱ्या ३३६ सोसायटयांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.