अमरावती- शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पू्र्ण होत आलं.मात्र,अद्यापही या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही.सुप्रिम कोर्टाच्या निकालाचे कारण देत गेल्या एका वर्षापासून हा मंत्री मंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र,मागील काही दिवसांपूर्वी सुप्रिम कोर्टाने शिंदे सरकारच्या बाजूने निकाल देत सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं.दरम्यान या निकालानंतर राज्यातील सत्ताधारी आमदार शिंदे-फडणवीसांनी लवकरात लवकर मंत्री मंडळाचा विस्तार करावा हि मागणी करत आहेत.अश्यात येत्या ८ ते १० दिवसात मंत्री मंडळाचा विस्तार होऊ शकेल अशी शक्यता शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केली.
याच धर्तीवर सध्या अमरावतीमध्ये असलेले आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांनी मंत्रीपदाबाबत विचारलं असता त्यांनी, ‘मला दिव्यांग खातं हवं आहे,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मला तसा शब्दही दिला आहे,असं मत व्यक्त केलं. बच्चू कडू हे मागील सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम करत होते.मात्र, सत्तातरानंतर ठाकरेंकडून शिंदेंकडे वळालेले बच्चू कडू आता दिव्यांग खातं हवं अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत.अमरावतीतून विधानसभेवर निवडून आलेले बच्चू कडू हे सामाजिक क्षेत्रात कायमच उत्तम काम करत आले आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्रभरातील दिव्यांग आणि वृद्धांसाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या आहेत. तसंच शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे.दरम्यान आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बच्चू कडू यांना कोणतं मंत्रीपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.