ठाणे : दिव्यात क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाली असताना,ही दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त
प्रीतम पाटील यांच्या आर्शिवादाने दिव्यात अनधिकृत बांधकामांना पेव आले आहे. येवढेच नाहीतर अनधिकृत बांधकामांसाठी आरक्षित भूखंड व सरकारी जागाही सर्रासपणे हडप केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. याशिवाय शहर बकाल करण्यास पाठबळ देणाऱ्या सहायक आयुक्त पाटील यांच्यावर तातडीने निलंबित करा अशी मागणी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी ठाणे शहर कार्यकारणी सदस्य दीपक नायडू, दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली. यावेळी आयुक्तांनी चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी ४ मे
२०२३ रोजी पत्र दिले आहे. त्यामध्ये दिव्यात अनधिकृत
बांधकामे सुरू नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच प्रभाग क्षेत्रामध्ये नेहमी गस्त घालण्याचे काम बीट निरीक्षक यांच्यामार्फत होत असते. अनधिकृत बांधकाम होऊ नये, याची दक्षता घेतली जाते. असे म्हटले आहे. याशिवाय केलेले तक्रारी अर्ज कार्यालया मार्फत निकाली काढण्यात येत आहे. अशी खोटी माहिती या पत्रात दिल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. दरम्यान मुंडे यांनी हे पत्र मिळण्याआधीचे आणि त्यानंतरचे GPS लोकेशन सह अनधिकृत बांधकामाचे फोटो आयुक्तांना दिली आहेत. यावरून ही बांधकामे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत, हे आता स्पष्ट दिसत होत आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने दिव्यात पाणीटंचाई आहे. नागरी सुविधांवरती ताण येत आहे, पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना वळविले जाते, आरक्षित भूखंड व सरकारी जागा हडप केल्या जात आहेत. आणि शहर कळत नकळत बकाल होत आहे. आरोप करताना या सर्व गोष्टींना सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील जबाबदार आहे. त्यांच्याकडून अनधिकृत बांधकामाला पाठबळ दिले जात असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आयुक्तांना केली असल्याचे मुंडे यांनी बोलताना सांगितले.