
जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | मे १९, २०२३.
“केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार देशातील प्रत्येक गावात होत आहे. अनेक गरीब कुटुंबांना ही योजना वरदान ठरत आहे. अनेकांना हक्काचे घर मिळाल्याने ही योजना लोकोत्तर ठरत असून जीवनमान उंचावण्यास सहाय्यभूत होत आहे. मात्र काही लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यरत आहोत.” असे प्रतिपादन भाजपा संगमेश्वरच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे यांनी केले.
“पिरंदवणे, गुरववाडी येथे रहाणारे श्री. सदानंद हरिश्चंद्र गुरव यांना या योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला होता. मात्र सहहिस्सेदारांनी संमती न दिल्याने सदर घरकुल दुसऱ्या जागेत बांधण्यासाठी अर्ज करण्याची वेळ आली. यावेळीही मंजूर जागेत तक्रारी उपस्थित झाल्या. शेवटी खटला न्यायालयात गेला. त्यानंतर ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेत घराच्या चालू कामाला स्थगिती दिली. सदर कुटुंब अत्यंत गरीब व दयनीय असून त्यांची पारिवारिक स्थिती अत्यंत बिकट आहे. याबाबत ‘सा. जनशक्तीचा दबाव’ मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. यावेळी तात्काळ मी तालुका सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये यांना सोबत घेऊन लाभार्थ्यांना भेट देण्यासाठी येथे आलो.”
“एक निवेदन देऊन ग्रामपंचायतीने सदर कामाची स्थगिती त्वरित उठवावी आणि लाभार्थ्याला अधिक त्रास न देता शक्य ते सहकार्य करावे. तसेच सदर प्रकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा तसेच उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांचेकडे पत्राद्वारे पाठवणार असल्याची माहिती दिली. ग्रामपंचायतीने कोणत्याही कारणाने लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ घेण्यापासून वंचित ठेऊ नये असेही सुनावले.” अशी माहिती सौ. कोमल रहाटे यांनी दिली.
यावेळी भाजपा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे सोशल मिडिया संयोजक श्री. योगेश मुळे, सरपंच श्री. विश्वास घेवडे, ग्रामसेविका सौ. माया गुरखे, गावचे मानकरी व तंटामुक्ती अध्यक्ष श्री. अरविंद मुळे, ज्येष्ठ नागरिक श्री. वासुदेव गुरव, श्री. संजय गुरव, लाभार्थी श्री. विश्वास गुरव, सौ. वैदेही गुरव, ग्रा.पं. कर्मचारी श्री. संतोष माने आदी उपस्थित होते.