नवी दिल्ली, 17 मे 2023-
भारतात तब्बल ३० लाख सिमकार्ड बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बोगस सिमकार्ड दूरसंचार मंत्रालयाने बंद केली आहेत. तर आता केंद्र सरकारने संचार साथी पोर्टलं लॉंच केलं आहे. या पोर्टलद्वारे आपल्या मोबाईल क्रमांकावर किती सिमकार्ड काढण्यात आले आहेत याची माहिती मिळू शकणार आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हे पोर्टल लॉंच करण्यात आलं. हे पोर्टल बहुआयामी आहे. मोबाईल चोरीपासून बोगस सिमकार्डची माहिती या पोर्टलमध्ये मिळते. मोबाईल चोरीला गेल्यास या पोर्टलद्वारे ऑनलाईन ट्रॅक करता येतो. यासोबतच तुमच्या क्रमांकावर किती सिमकार्ड घेण्यात आले आहेत याची माहितीही मिळते. जर तुमच्या लक्षात आलं की अन्य क्रमांक बनावट आहे. तर तो मोबाईल क्रमांक तुम्ही बंद करु शकता, अशी सुविधा या पोर्टलमध्ये आहे.
यामध्ये सर्वाधिक तामिळनाडूमध्ये तब्बल ५५ हजार तर मुंबईत ३० हजार बनावट सिमकार्ड जारी झाल्याचे समजते आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील अब्दुल मन्सूरी या आरोपीने स्वतःचा फोटो वापरून तब्बल ६८५ सिमकार्ड घेतली होती. त्याला मलबार पोलिसांनी अटक केली आहे. सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने भारतातील ३० लाख बनावट सिमकार्ड बंद केले आहेत. तर मुंबईत ३० हजार जारी केलेल्या सिमकार्डचा तपास सुरु आहे.