दिवा : प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई आणि गटारांच्या सफाईच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरवात करण्यात आलेली असून, या साफसफाई करण्यात कुठल्याही प्रकारची सुसूत्रता आणि नियोजनबद्धता दिसून येत नाहीये. गटारांची साफसफाई नेमकी कुठून कशी करावी किंवा ती कशी असावी जेणेकरून पाण्याचा निचरा मुख्य नाल्याना होऊ शकेल याचा कुठलाही सारासार विचार केला जात नसल्याचा आरोप मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी केला आहे. एखाद्या ठिकाणच्या गटारांची साफसफाई सुरू केल्यानंतर ती पूर्ण करणे अपेक्षित असताना ते काम तसेच अर्धवट सोडून दुसरीकडे काम सुरू केले जात आहे. परिणामी सर्वच ठिकाणी गटारांची साफसफाई अर्धवट सुरू आहे. गटारांची सफाई करताना गटाराचे पाणी ज्या ठिकाणी मुख्य नाल्याला मिळते तिथून साफसफाई करत येणे अपेक्षित असताना, फक्त वरवरचा कचरा गटारातून बाहेर काढला जात असून प्रत्यक्षात गटारातील सर्व गाळ आणि माती ही तशीच गटारात पडून राहिलेली दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
काही ठिकाणी फक्त सुरवातीची काही झाकणं आणि शेवटची काही झाकणं उघडून सफाई करून मधली झाकण न उघडता ती तशीच ठेवली जात आहेत. याबाबतचे सर्व फोटो आणि व्हिडिओ पुराव्यानिशी आपल्याकडे उपलब्ध असल्याचे तुषार पाटील यांनी सांगितले. ठामपा आयुक्त मा. श्री.अभिजित बांगर साहेब यांच्या नुसार सर्वच ठिकाणी १००% नालेसफाई अपेक्षित आहे.पण ज्या प्रकारे दिव्यात ही साफसफाई होत आहे त्यातून हे उद्दिष्ट कधी साध्य होईल असे वाटत नाही. गटारातून काढलेला कचरा पाणी सुकल्यानंतर तिथून घेऊन जाणे अपेक्षित असताना तो कचरा गटारांच्या तोंडावर तसाच ठेवला जातो आणि पुन्हा तोच कचरा गटारांमध्ये जाऊन पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे दिव्यातील होणारी ही नालेसफाई नियोजन पूर्वक करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना द्याव्यात असे निवेदन त्यांनी आपल्या पत्रातून केले आहे.
जाहिरात