
मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर राज्यातील काही भागात गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
मात्र आता उन्हाचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी उद्यापासून म्हणजेच १७ मे पासून उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम देशासह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी उष्णता वाढत आहे. १७ मे पासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. IMD ने राज्यभरात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे.
आयएमडीच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 17 मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेपासून आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर जाताना छत्री स्कार्फचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. दररोज तापमानात वाढ होत आहे असून पुढील 10 दिवस उष्णतेची लाट असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. दुपारी बारा ते चार या वेळेत घरा बाहेर पडणे टाळा, पुरेसे पाणी घ्या, हलक्या रंगाच्या सुती कपड्यांचा वापर करावा, घरा बाहेर पडतांना टोपी, रूमाल, छत्री याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मोचा चक्रीवादळ रविवारी म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं. त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा मान्सूनला उशीर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.