
रत्नागिरी- आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. कंपनीतर्फे काेकणातील समुद्रकिनारी माेठा स्टील प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत मुंबई येथे बैठक झाली असून, प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास व पाहणी करून औद्याेगिक विकास महामंडळाला माहिती देण्यात येणार आहे.आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून, त्यांनी नवा प्रकल्प कोकणात उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर व आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. चे राजेंद्र तोडापूरकर यांच्यात मुंबई येथे बैठक झाली.
या बैठकीत कंपनीला अपेक्षित असलेल्या ठिकाणांची माहिती औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. या कंपनीकडून ८० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही प्राथमिक चर्चा केली. महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली होती. यासाठी ५ हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याचीही विनंती केली आहे.