
मुंबई- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे काँग्रेस नेत्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये या निवडणुकीत काट्याची टक्कार पहायला मिळाली. समोर आलेल्या निकालानंतर सर्वच राजकीय नेते यावर आपलं मत व्यक्त आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेसचे कौतुक केले आहे. तर भाजपचे कान टोचले आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, कर्नाटकमधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिमाण आहे. तर कर्नाटकमधील भाजपचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हटलं आहे की, आपलं कोण वाकड करू शकतो असा जो विचार करतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला लोकांना कधी गृहीत धरू नये.
याचा सर्वांनीच बोध घेण्याची गरज आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा. असा सल्ला राज ठाकरेंनी भाजपला दिला आहे. कर्नाटकात बहुमतासाठी लागणारा ११३ चा जादुई आकडा काँग्रेसने पार केला आहे. या निवडणुकीत १३५ जागा मिळवून काँग्रेसने भाजपच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. मात्र कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडून अद्याप आलेले नाही. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी एक फॉर्म्युला निश्चितच तयार आहे, तो म्हणजे काँग्रेस कर्नाटकात प्रत्येक वर्गाला प्रतिनिधित्व देण्याची तयारी करत आहे.