
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली. कर्नाटकात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पण कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय घेणे काँग्रेसला काहीसं कठीण जाणार आहे.
कर्नाटकातील विजयानंतर मुख्यमंत्र्याच्या नावाबाबत रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी आज विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्री नेमण्यासाठी एक समिती तयार केली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे नेते जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेसने डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवल्यास केंद्रीय एजन्सीद्वारे शिवकुमार यांच्यावर कारवाईचं हत्यार उपसलं जाऊ शकतं. यामुळे सरकारच्या अडचणी वाढू शकतात. अशा परिस्थितीत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवणे काँग्रेसला सोईचं ठरू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.