
नवी दिल्ली- ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
या दोन्ही नेत्यांमधील भेटीचं नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. त्यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘मला आज माझ्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची मेजवानी करण्याची संधी मिळाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
या बैठकीला आदित्य ठाकरेंसोबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. कर्नाटकात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. याच्या एका दिवसानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली. या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. महाराष्ट्रात पंजाबी मतदारांची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांची ठाकरे गटाला मदत होऊ शकते, असं बोललं जात आहे. दरम्यान, विरोधकांची मोट बांधण्यासाठी ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.