व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश…..

Spread the love

सकाळी दिवस सुरू झाला की ओट्यापाशी नाश्ता, स्वयंपाक सगळ्यांचे डबे भरणे, मुलांचे आवरणे, साफसफाईची कामे आणि ऑफीसला जाण्याची घाई. पुन्हा ऑफीस सुटलं की घरी पोहचून स्वयंपाक करायचा असल्याने घरी पोहोचण्याची घाई. या सगळ्या धावपळीत महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होतोच असे नाही. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता आपण अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्याला नीट बसून खायलाही वेळ होत नाही. त्यामुळे व्यायामाला तर वेळ मिळेल याची शक्यताच नसते. घरातली कामे म्हणजे व्यायाम नाही. त्यातही दिवसभर बैठे काम असेल तर शरीराची फारशी हालचाल होत नाही. यामुळे कालांतराने पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा, सांधेदुखीच्या तक्रारी उद्भवायला लागतात.

आजकाल कमी वयातच या सगळ्या तक्रारी उद्भवत असल्याने आपण आपल्या हातानेच आरोग्याची हेळसांड करत असल्याचे दिसते. शरीराचे कार्य सुरळीत चालायचे तर शरीराला थोडा तरी व्यायाम हवाच. यासाठी रोजच्या दिनक्रमात सहज करता येतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया

१. सूर्यनमस्कार…

आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो, आंघोळ करतो. त्याचप्रमाणे १२ सूर्यनमस्कार घालण्याची शरीराला सवय लावली तर संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. १२ सूर्यनमस्कार घालायला मोजून १२ ते १५ मिनीटे लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर इतर गोष्टींप्रमाणेच आपण स्वत:साठी हा वेळ आवर्जून काढायला हवा. यामुळे आपल्याला नक्कीच दिवसभर फ्रेश वाटेल.

२. जीने चढ-उतार…
आपण वरच्या मजल्यावर राहत असू तर लिफ्टचा वापर न करता आवर्जून जिन्यांचा वापर करायला हवा. ऑफीसमध्येही लिफ्टच्या ऐवजी जिन्यानेच चढ-उतार करायला हवी. यामुळे किमान व्यायाम होतो. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा जीने चढ-उतार केल्यास आपला एन्ड्युरन्स चांगला राहण्यास मदत होते आणि स्टॅमिनाही वाढतो.

३. शतपावली…

दिवसभराचे काम करुन आपण आधीच थकलेले असतो. त्यातही संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक आणि मागची आवराआवरी, दुसऱ्या दिवशीची तयारी हे करता करता आपण पार थकून जातो. त्यामुळे जेवण झाल्यावर कधी एकदा आपण आडवे होतो असे आपल्याला होऊन जाते. अशावेळी कंटाळा घालवण्यासाठी आपण टिव्ही पाहणे किंवा एकमेकांशी गप्पा मारणे हे आवर्जून करतो. त्या वेळात आपण घराच्या आजुबाजूला १५ मिनीटे शतपावली केल्यास दिवसभराचा ताण तर निघून जातोच पण अन्न पचण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. शरीराची हालचाल झाल्याने झोपही गाढ लागण्यास मदत होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page