
छ.संभाजीनगर ,10 मे 2023- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावी इयत्तेच्या परीक्षांचे निकाल तोंडावर असताना उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षर बदल आणि कथित गैरप्रकारांवर बोर्डाच्या येथील कार्यालयात मंगळवारी सुनावणी झाली. पहिल्याच दिवशी ८७ प्रकरणांत चौकशी समितीने विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. यात विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांत अगदी मोजक्या प्रश्नांची जी उत्तरे लिहिली गेली आहेत ती इतर कुणीतरी नंतर लिहिली असल्याचा दावा केला आहे.
हस्ताक्षर बदल असलेली ही प्रश्नांची उत्तरे एका ओळीत तर काही उत्तरपत्रिकांत ती तीन ओळीमध्ये लिहिली गेली आहेत. या प्रकारामुळे आता निकाल राखून ठेवला जाणार का, किंवा आपण लिहिलेल्या बरोबर उत्तरांच्या गुणांवर परिणाम होणार का, या विचाराने सर्वच विद्यार्थी व पालक धास्तावले आहेत.
पेपर तपासताना शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशीसाठी बोलावले आहे. विद्यार्थी स्पष्ट नाकारत आहेत. त्यामुळे हा बदल कुणी केला असा प्रश्न विद्यार्थी आणि बोर्डालाही पडलाय. या मुलांचे आता निकाल उशिराने लागण्याची शक्यता आहे. बोर्डामार्फत या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली जाईल असे अनिल साबळे, अध्यक्ष बोर्ड यांनी असे म्हटले आहे.