
कर्नाटक- कर्नाटकमध्ये उद्या (१० मे) विधानसभेसाठी मतदान संपन्न होणार आहे. भाजपाला मागच्या ३८ वर्षांच्या काळातील अँटी इन्कम्बसीचे चक्र खंडित करायचे असून राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता प्राप्त करायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या एक दिवस आधी कर्नाटकच्या जनतेसाठी खुले पत्र लिहिले आहे.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक आता एका दिवसावर येऊन ठेपली आहे. उद्या १० मे रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडेल. तर १३ मे रोजी निकाल लागेल. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकच्या मतदारांना आवाहन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. तसेच एका व्हिडीओ संदेशाद्वारे भाजपाला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. मागच्या ३८ वर्षांपासून कोणत्याही सरकारला सलग दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन करता आलेले नाही. कर्नाटकची जनता प्रत्येक वेळी नव्या पक्षाला सत्ता देते. या वेळी हा ३८ वर्षांचा पॅटर्न मोडून काढणे आणि सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.
आपल्या आवाहनादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुम्ही माझ्यावर नेहमीच प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला. माझ्यासाठी हे दैवी आशीर्वादापेक्षा कमी नाही. स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या वर्षात आपला देश एक विकसित राष्ट्र बनावे, असे ध्येय सर्व भारतीय नागरिकांनी ठरवले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी कर्नाटक राज्य पुढाकार घेत असून या ध्येयाप्रति वाटचाल करीत आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमाकांची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्याला लवकरात लवकर सर्वोच्च तीन अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये सामील व्हायचे आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा कर्नाटकची अर्थव्यवस्था जलदगतीने पुढे जाऊन एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करेल.”
शनिवारी ६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरु येथे २६ किलोमीटरच्या रोड शोमध्ये सहभाग घेतला. भाजपाच्या आक्रमक प्रचारनीतीमुळे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडीएससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज आपल्या संदेशात मोदी म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेने साडेतीन वर्षांचा डबल इंजिन सरकारचा कार्यकाळ पाहिला आहे. भाजपाच्या निर्णायक, लक्ष्यावर केंद्रित आणि दूरदृष्टी असलेल्या धोरणामुळे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय जनता पार्टी कर्नाटक आणि कर्नाटकच्या जनतेबद्दल कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदींचे कर्नाटकातील जनतेसाठी- https://twitter.com/narendramodi/status/1655775336318267393?s=20

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, करोना काळात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे कर्नाटकमध्ये दरवर्षी रुपये ९० हजार कोटींची परकीय गुंतवणूक आली. आधीच्या सरकारच्या काळात हीच गुंतवणूक फक्त ३० हजार कोटी रुपये एवढीच होती. गुंतवणूक, उद्योग आणि नावीन्यपूर्ण संशोधनात कर्नाटकला प्रथम क्रमांकाचे राज्य आपल्याला बनवायचे आहे. यासोबतच शिक्षण, रोजगार आणि उद्यमशीलतेमध्येही राज्याला प्रथम क्रमांकावर न्यायचे आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील सोयी-सुविधा उभारण्याबाबत मोदी म्हणाले की, भावी पिढ्यांसाठी कर्नाटकमध्ये शहरी सोयी-सुविधा उभारण्याचे काम भाजपा सरकार यापुढेही करीत राहील. वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनशैली सुधारणे आणि महिला व युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याचे काम आम्ही करीत राहू. “कर्नाटकमधील प्रत्येक माणसाचे स्वप्न हे माझे स्वप्न आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
खुल्या पत्रासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ संदेशदेखील प्रसारित केला आहे. त्यात ते म्हणाले, “कर्नाटकची जनता उद्या (१० मे) कर्नाटकला प्रथम क्रमाकांचे राज्य बनविण्यासाठी मतदान करेल.”
निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्यांनुसार कर्नाटकात ५.२ कोटी पात्र मतदार आहेत. तर ९.१७ लाख नवमतदार आहेत, जे पहिल्यांदा मतदान करतील. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी राज्यात ५८ हजार २८२ मतदार केंद्रे उभारण्यात आली आहेत. २२४ जागांसाठी २,६१३ मतदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात महिलांची संख्या फक्त १८५ एवढी आहे. भाजपाने सर्व २२४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत, काँग्रेसने २२३ तर जेडीएसने २०७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.