
चेन्नई- एका मजूराच्या मुलीने बोर्डाच्या परीक्षेत इतिहास घडवला आहे. या मुलीने १२ वीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे. तामिळनाडूच्या बोर्ड परीक्षेचा निकाल समोर आला आहे. यात या मुलीने ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
नंदिनी असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. तिचा निकालाची संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. सोशल मीडियावर लोक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. कारण नंदीनीने १२ बोर्डाच्या परीक्षेत 600 पैकी 600 गुण मिळवले आहेत. नंदीनीने अशी उत्तर पत्रिका लिहिली की शिक्षकांना एकही गुण कापता आला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नंदिनी तामिळनाडूतील दिंडीगुल येथील रहिवासी असून रोज कामावर जाणाऱ्या एका मजुराची मुलगी आहे. तिच्या वडिलांचं नाव श्रवण कुमार आहे. नंदिनीने अन्नामलैयार गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि तिने 12 वीची परीक्षा उत्कृष्ट पद्धतीने उत्तीर्ण केली. बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच नंदिनीच्या घरात आनंदाचा वर्षाव झाला. नंदिनीने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिच्या आई वडिलांचा उर अभिमानाने भरून गेला आहे.
या यशाचे श्रेय नंदिनीने आपल्या वडिलांनाच दिले आहे. नंदिनीला तिच्या वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. नंदिनी म्हणते की आज तिने जे काही मिळवले ते फक्त तिच्या वडिलांमुळेच. शिक्षण हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, हे त्यांनी नेहमी नंदिनीला शिकवलं. नंदिनीला तिच्या सर्व सहा विषयांत पूर्ण १०० गुण मिळाले. याचा अर्थ नंदिनीने सर्व विषयांत ६०० पैकी ६०० गुण मिळवले आहेत. या निकालानंतर देशभरातील सोशल मीडियावर नंदनीची चर्चा सुरू आहे. लोक तिचं मनापासून अभिनंदन करत आहेत. नंदिनीच्या यशाबद्दल सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. नंदिनी लाखो मुलांसाठी एक प्रेरणा बनली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार नंदिनीने तामिळ, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य, अकाउंटन्सी आणि कॉम्प्युटर अँप्लिकेशन या 6 विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.