
राजस्थान 8, मे 2023 –
भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-२१ सोमवारी, ८ मे रोजी सकाळी राजस्थानच्या हनुमानगढ जवळ कोसळले. या विमानाने सूरतगढ येथून उड्डाण केले होते. पण बहलोल नगर भागातील एका घरावर हे विमान कोसळल्याचे समोर येत आहे, ज्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच विमानातील वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने उडी घेतल्याने तो सुखरुप असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेबाबत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, वैमानिकाला एअरलिफ्ट केले गेले आहे. वैमानिकासाठी हवाई दलाचे एमआय-१७ पाठवले होते. मिग-२१ विमान ज्या घरावर कोसळले, त्यावेळेस तीन महिला आणि एक पुरुष तिथे उपस्थित होते. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या वर्षात आतापर्यंत किती लष्करी विमाने कोसळली?
वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये राजस्थानच्या भरतपूरमध्ये प्रशिक्षणादरम्यान सुखोई एसयू-30 आणि मिराज 2000 ही दोन भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने कोसळली होती. या अपघातात पायलटला जीव गमवावा लागला. एक विमान मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळले, तर दुसरे विमान राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले होते. तसेच गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. कोची येथे एप्रिलमध्ये कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने प्रशिक्षणादरम्यान क्रॅश लँडिंग केल्यावर दुसरा अपघात झाला.